मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर अधिक भक्कम ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जगासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने हा उत्सव युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत समाविष्ट व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रेक्लेमेशन येथे ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठाचे तसेच महाराष्ट्र गणेशोत्सव राज्य महोत्सवाच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेते रितेश देशमुख, नेहा पेंडसे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, श्रीपाद आष्टीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलार यांनी सांगितले की, राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरविले असून हा उत्सव केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक नसून सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय भावना आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा लोकउत्सव आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेली लोकचळवळ आजही घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात आहे.
यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर देश-विदेशातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, उत्सवाची माहिती जागतिक स्तरावर सहज उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला १२ फुटी भव्य मोदकाचा फिरता चित्ररथही सादर करण्यात आला. या चित्ररथामध्ये श्री गणेशाची प्रतिमा, लोकमान्य टिळकांचे योगदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासाशी संबंधित विविध कलात्मक संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. हा चित्ररथ वर्षभर राज्यभर फिरविण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून गणेशोत्सवाची परंपरा, लोककला, सांस्कृतिक वारसा आणि राज्य महोत्सवाची संकल्पना अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.






