मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची तसेच लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीची दखल घेत रेल्वे पोलिसांनी मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. विशेषतः चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), तिकीट तपासणी कर्मचारी आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वेच्या उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त समन्वयातून विशेष सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. नियमित तैनात असलेल्या ३,५०० पोलिसांव्यतिरिक्त यंदा ४५० अतिरिक्त गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, विशेष रेल्वेगाड्या, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी येणारे हजारो भाविक चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांचा वापर करत असल्याने या दोन्ही स्थानकांवर २१९ आरपीएफ जवान आणि ५५ तिकीट तपासणी कर्मचारी विशेष बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यावर गर्दीचे नियोजन, प्रवाशांना मार्गदर्शन तसेच विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, दिवा, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबईतील १३९ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर दररोज ७५ ते ८० लाख प्रवाशांची ये-जा होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. स्फोटके, अमली पदार्थ तसेच संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी बेल्जियन मालिनोआ, लॅब्राडोर रिट्रिव्हर, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमन जातींच्या श्वान पथकांकडून स्थानके, लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची नियमित तपासणी केली जात आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ आरपीएफ, रेल्वे पोलीस, स्थानक व्यवस्थापक किंवा १३९ या रेल्वे मदतवाहिनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच प्रवाशांनी शिस्त पाळून रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक सूचनांचे पालन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






