पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पबवर मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पब सील केले. कोझी बारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दाखल झाले असून ते आतमध्ये तपासणी करत आहेत. पुणे पोलिसांनी या बार आणि पबवर अल्पवयीन मुलाला मद्य विकण्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. अटकेत असलेल्या या बार मलाकांना आज कोर्टातमध्ये हजर करण्यात आले होते. कोटनि त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोझी बार आणि ब्लॅक पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मोठी कारवाई करत ते सील केले. या बारमधील मद्याची विक्री बंद करण्यात आली आहे. ‘याठिकाणी कुठल्याच दारुशी संबंधित व्यवहार त्यांना करता येणार नाही. पुढील आदेश येईलपर्यंत हे व्यवहार बंद राहतील.’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोझी बार आणि ब्लॅक पबच्या मालक आणि व्यवस्थापकाला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात भरधाव कार चालवून अल्पवयीन मुलाने दोघांचे बळी घेतले होते. कार चालवण्यापूर्वी आरोपी मुलगा मद्य प्यायला होता. त्याने मित्रांसोबत कोझी बारमध्ये पार्टी केली होती. या प्रकरणात कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि ब्लॅक पबचे मालक यांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला. कोझी बारचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये महा पुरविल्याप्रकरणी दोन्ही बार मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी केली होती. आरोपींच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पुणे पोलिस आयुक्तालयाला भेट दिली आणि याप्रकरणाचे सर्व अपडेट्स जाणून घेतले. काही वेळातच ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे.