मुंबई : मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सर्वच मद्यविक्री करणाऱ्या दुकांनामध्ये मुख्य काउंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अनिवार्य आहे. मुंबईत नुकतंच झालेलं वरळी हिट अँड रन प्रकरण आणि में महिन्यात पुण्यातील पोर्शेच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केलीय, बार आणि पबमध्ये रेस्टॉरंटमधील मुख्य काउंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केलंय. उत्पादन शुल्क अधिकारी बार आणि पबमध्ये होणाऱ्या अनियमिततेवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांचं नियंत्रण करणार आहेत. यासाठी विभागाने एक पाच सदस्यीय टीम देखील तयार केलीय. ही टीम एआयच्या साहाय्याने काम करणार आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे वय त्याच्या चेहऱ्यावरून निर्धारित करण्यासाठी कॅमेरे बसवले जाणार आहेत.
एआय कॅमेरा २१ वर्षाखालील व्यक्तींचा शोध घेईल. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला त्यांच्या मोबाईल फोनवर सूचना मिळेल. या सर्व यंत्रणा दुर्घटना टाळतील, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्काच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याची माहिती दिली. नियमानुसार फक्त २१ वर्षावरील लोकच बारमध्ये प्रवेश करू शकतात. २१ ते २५ मधील लोकांना हार्ड ड्रिंक्स देण्यास मनाई आहे. ते फक्त पाच टक्क्यांपेक्षा कमी अल्कोहोल असणारे बिअर किंवा वाइन घेऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत बार मालक आणि व्यवस्थापकांना सूचना देऊन सतर्क केलं जाईल. अल्पवयीन मुलांना दारू पिण्याची परवानगी देण्यापूर्वी बारमालक दोनदा विचार करतील, कारण त्यांना थेट पुराव्यासह जबाबदार धरलं जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे म्हणाले की, विभाग आता मुंबईतील सुमारे २ हजार बार, रेस्टॉरंट आणि पबमधील कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर आम्ही एक विशेष मोहीम सुरू केलीय, सर्व बार आणि पबमध्ये परमिट रूम आणि बार काउंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केलेत. या भागात तैनात असलेले उत्पादन शुल्क अधिकारी बार मालकांकडून ईमेल आयडी आणि पासवर्ड घेऊन कॅमेऱ्यांचा अक्सेस मिळवतील, त्यावर लक्ष ठेवतील असं अधिकारी सुर्वे यांनी सांगितलंय.