मुंबई : राज्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये विजेची व्यवस्था नसल्यामुळे नाविन्यपूर्ण योजना म्हणून महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्यात आजघडीला ९६ हजार अंगणवाड्या असून १३ हजार मिनी अंगणवाड्या आहेत. यातील १३ हजार अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करून त्यांना यापुढे अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे राज्यात एक लाख १० हजार अंगणवाड्या असतील. या अंगणवाड्यांमधून शून्य ते सहा वर्षांच्या ५८ लाख बालकांना तसेच सुमारे दहा लाख स्तनदा माता व गर्भवती महिलांना पोषण आहार देण्यात येतो. जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून बालके व महिलांना पोषण आहार देण्याबरोबरच या बालकांच्या आरोग्य तपासणी व लसीकरणाचे कामही अंगणवाडी सेविकांना करावे लागते. याशिवाय तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे कामही त्यांना करावे लागते.
विजेच्या अभावी सुमारे ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा होत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे, सचिव अनुपकुमार यादव तसेच आयुक्त रुबल अग्रवाल व संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेऊन या सर्व अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंगणवाड्यांसाठी एक किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा संच बसविण्यात येणार आहेत. यासाठी राज्यस्तरावरून ई निविदेच्या माध्यमातून हे सौरऊर्जा संच खरेदी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी संगितले. यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च उपेक्षित आहे. अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी गेले चाळीस दिवस संप सुरू असून या संपाचा मोठा फटका अंगणवाडीतील बालकांना व महिलांना बसत आहे. अंगणवाड्यांमध्ये पुरेशा सुविधा मिळणे, अंगणवाड्यांच्या भाड्यामध्ये वाढ तसेच मोबाईलसह अनेक मागण्या या अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी केल्या असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वेळोवेळी चर्चा करून यातील अनेक मागण्या मान्य केल्या तर काहींबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. अंगणवा़डी सेविकांनीही मागण्यांप्रमाणेच आपली जबाबदारी ओळखून आता संप मागे घ्यावा असे आवाहन आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे. अंगणवाडी सेविकांसह अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी आगमी काळात काही योजना राबिवल्या जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यातील पहिला टप्पा म्हणून ज्या अंगणवाड्यांमध्ये विजेची सुविधा नव्हती तेथे सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये विजेची व्यवस्था नाही अशा ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्ज संच बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठीचा शंभर टक्के खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी पुणेस्थित महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेकडून (मेडा) आवश्यक ती माहिती करून घेण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्राच्या छतावर एक किलोवॉट क्षमतेचे हे संच बसविण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या बहुतेक मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्यामुळे व काही मागण्या मान्य केलेल्या असल्याने त्यांनी त्यांच्या हक्कांबरोबरच जबाबदारीची जाणीव ठेवून संप मागे घेतला पाहिजे.