नागपूर (सतीश भालेराव) : उपराजधानीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शहरात लावण्यात आलेली सुरक्षा यंत्रणा आता कुचकामी ठरू लागली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या कानाकोपऱ्यात बसवण्यात आलेल्या ३,६८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी १,००० पेक्षा जास्त कॅमेरे सध्या धुळखात किंवा बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे नागपूर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकृत अहवालानुसार, शहरात २,६११ कॅमेरे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तांत्रिक तपासणीत असे दिसून आले आहे की, यातील केवळ २,२१३ कॅमेरेच फुटेज पाठवू शकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पूर्ण क्षमतेने आणि अचूकपणे काम करणाऱ्या कॅमेऱ्यांची संख्या केवळ १,०७५ च्या आसपास आहे. याचाच अर्थ, निम्म्याहून अधिक शहर सध्या ‘अंधारात’ आहे. कॅमेरे बंद असल्याने केवळ देखरेखच नाही, तर स्मार्ट सिटीचे महत्त्वाचे फीचर्सही बंद पडले आहेत. ANPR (ऑटोमैटिक नंबर प्लेट ओळख): चोरीच्या गाड्या किंवा गुन्हेगारांच्या वाहनांचा शोध घेणे कठीण झाले आहे. सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांवर वचक बसवणारी यंत्रणा कोलमडली आहे. वाहतुकीचे नियोजन आणि नियमन करण्यात अडचणी येत आहेत. एखाद्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आता सरकारी स्मार्ट कॅमेऱ्यांऐवजी दुकानदारांचे खाजगी सीसीटीव्ही किंवा नागरिकांनी मोबाईलवर काढलेल्या व्हिडिओवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे तपासात विलंब होत असून गुन्हेगारांना पळ काढण्यासाठी वाव मिळत आहे. शहरात वाढती गुन्हेगारी आणि ट्रॅफिकच्या समस्या पाहता, हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही ‘स्मार्ट’ यंत्रणा देखभालीअभावी (Maintenance) पांढरा हत्ती ठरत असल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाकडे तातडीने लक्ष न दिल्यास, गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







