ठाणे : शाळेची वार्षिक फी न भरल्यामुळे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या पोलिस स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत फी भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता पण आज शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसण्यात आले. यासंदर्भात पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासोबतच शिंदे गटाच्या युवासेनाप्रमुखांनी मुख्याध्यापकाला यासंदर्भात जाब विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची फी भरण्यासाठी दोन दिवस बाकी असतानाही ठाणे पोलिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आले आहे. शाळेच्या व्यवस्थापकांकडून विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये भरडले जात आहेत. शाळेने दिलेल्या फी भरण्याच्या ॲपमध्ये 12 जून ही शेवटची तारीख असतानाही आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.
ठाणे पोलिस स्कूल आजपासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्याने तुम्ही त्यांना घेऊन जा असा निरोप देण्यात आला. यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला असला तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत. शाळेतून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेचा निषेध केला. शाळेकडून विद्यार्थ्यांवर ज्यापद्धतीने कारवाई करण्यात आली त्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर शिवसेना युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी शाळेचा मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी झटकली. या बाबतीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार आली असल्याचे त्यांनी सांगितले.