शिर्डी : राज्यभर गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या असून पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू आणि धार्मिक साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. मात्र, शिर्डीत पूजासाहित्याच्या विक्रीतून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरतालिका पूजेसाठी विक्रीस ठेवलेल्या साहित्यामध्ये चक्क प्लास्टिकचे बदाम आढळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही बाब पूजेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या शिर्डी नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित दुकानावर धडक कारवाई केली. तपासात पूजेसाठीच्या साहित्यामध्ये बनावट किंवा निकृष्ट वस्तूंची विक्री होत असल्याचे प्राथमिक स्तरावर आढळून आले. धार्मिक श्रद्धेशी संबंधित वस्तूंमध्ये अशा प्रकारे फसवणूक होत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
या घटनेनंतर शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील पूजासाहित्य विक्री करणाऱ्या सर्व दुकानांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या धार्मिक साहित्याची गुणवत्ता, स्वरूप आणि अस्सलपणा तपासला जात असून बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गणेशोत्सव आणि इतर धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पूजासाहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने नागरिकांनीही वस्तू खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि अस्सलपणा तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भेसळविरोधी कारवाया सुरू असतानाच पूजासाहित्यात प्लास्टिकचे बदाम आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. धार्मिक भावनांशी संबंधित वस्तूंमध्ये अशा प्रकारे बनावट साहित्याचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.






