मुंबई : आर्यन खान याच्या सुटकेप्रकरणी लाच मागितल्याच्या आरोपांप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पश्चिम क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर २७ मार्चपर्यंत अटकेची कारवाई करणार नाही, अशी हमी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात दिली.
आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खान याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने देखील वानखेडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दाखल केले आहे. त्यामुळे, अटक टाळण्यासाठी आणि प्रकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर वानखेडे यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, ईडीतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला. तसेच, या प्रकरणी महान्यायवादी तुषार मेहता हे स्वत: युक्तिवाद करणार असल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २७ मार्च रोजी ठेवली. , तोपर्यंत वानखेडे यांच्यावर अटकेची कारवाई करणार नसल्याची हमी कायम ठेवण्याचे ईडीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.