नवी मुंबई : मुंबई पुणे महामार्गावर दरोडा टाकून लुटमार करणारी चौघांची टोळी पनवेल तालुका पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली. या टोळीतील चौघांकडून एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पुणे महामार्गावर पळस्पे जवळ आपल्या मालवाहतूक वाहनाचे टायर तपासात असताना ५ ते ६ जणांनी हल्ला करत रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचत मुख्य संशयित आरोपी विशाल जाधव याला अटक केली. जाधव याची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील इतर चार संशयितांना आरोपींनी अटक करुन त्यांच्याकडून या गुन्ह्यात चोरी केलेल्या एका मोबाईलसह इतर गुन्ह्यात चोरलेले २१ मोबाईल गुन्ह्यात वापरलेली बाईक, हत्यार असे एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.