मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर रस्त्यावर दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याच्या दृष्टीने डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वीच एमएमआरडीएकडून हे काम करण्यात आले असून तब्बल वीस कोटींचा खर्च त्यावर करण्यात आला आहे. पण या रस्त्यावर पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. ही अशीच परिस्थिती शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांची आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरकर हैराण झाले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये काशिमिरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. ह्याच रस्त्यावर दरवर्षीच पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यामुळे पावसाळ्यात आणि मिरा-भाईंदर रस्त्यावरील खड्डे हे एक समीकरण झाले होते. मागील काही वर्षांपासून मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे ह्या खड्डे समस्येत आणखी भर पडली होती. यातून सुटका करण्याच्या दृष्टिने नागरिकांकडून संपूर्ण रस्त्याच्या कामाची मागणी केली जात होती.
त्यानंतर आमदार गीता जैन पाठपुराव्यावरून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एमएमआरडीएकडून २०२१ मध्ये करण्यात आले. यावर तब्बल २० कोटींचा खर्च करण्यात आला. डांबरीकरणावर करण्यात आलेला हा खर्च अधिक असल्याचे सांगत, अनेकांकडून त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तद्नंतर मागच्या दोन वर्षांत रस्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले होते. यंदा मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रामुख्याने दुचाकीचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मिरा-भाईंदरच्या अंतर्गत डांबरी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाने उसंत घेतली असली, तरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे मनपाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराच्या वाहतूककोंडीतदेखील भर पडली आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेणार का? असा प्रश्न जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मिरा-भाईंदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे श्रेय आमदार गीता जैन यांनी घेतले होते. तसे फलक त्यांनी संपूर्ण शहरात लावले होते. आता रस्त्याच्या कामात झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचारामुळे खड्डे पडले आहेत. याचे श्रेयदेखील जैन यांनी घ्यावे, तसेच त्याचे फलक त्यांनी लावावेत. अन्यथा आम्ही फलक लावू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी दिली.
मिरा-भाईंदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करत, पैसे वसूल करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार लवकरच कारवाई होईल. तसेच रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे कामदेखील हाती घेतले जाईल.- गीता जैन, आमदार, मिरा-भाईंदर