मुंबई : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत ट्रायडंट हॉटेल येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत चार लाख ५० हजार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमधून सहा लाख ७८ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. पुढच्या पाच वर्षात राजस्थानच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान ३५ हजार कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट यावेळी मुख्यमंत्री शर्मा यांनी जाहीर केले. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये डिसेंबरमध्ये ९, १० व ११ रोजी ‘रायजिंग राजस्थान’ ही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद होणार आहे. त्या निमित्त मुख्यमंत्री शर्मा यांनी मुंबईत ‘रोड शो’ केला. यावेळी राजस्थानचे उद्योगमंत्री राज्यवर्धन राठोड, राज्याचे मुख्य सचिव सुधांश पंत, मुख्यमंत्र्यांचे सचिव शिखर अग्रवाल, उद्योग विभागाचे सचिव अजिताभ शर्मा उपस्थित होते.
मुख्यमंत्री शर्मा यावेळी म्हणाले, राजस्थान खनिजांनी समृद्ध राज्य आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेल, भरड धान्य, स्वच्छ सूर्यप्रकाश आमच्या राज्यात आहे. देशातले तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेचे दुसऱ्या क्रमाकांचे लोहमार्गाचे जाळे राज्यात आहे. आरोग्य, पर्यटन, खाण, पारंपरिक ऊर्जा, हस्तकला, अन्नप्रक्रिया या क्षेत्रात राजस्थानात गुंतवणुकीस वाव आहे. नस्तींचा निपटारा करण्याचा अवधी आम्ही काही तासांवर आणला आहे. गुंतवणूकदारांना स्वस्त वीज, मुलबल पाणी आणि सलग जमीन आम्ही देतो आहोत. राजस्थान सरकार उद्योगस्नेही २० धोरणे आणत आहे. आजपर्यंत आलेला एकही उद्योग राजस्थानातून परत गेलेला नाही. विवाह करा किंवा येथे घरे बांधा, ‘पधारो हमारे देश’ अशी हाक मुख्यमंत्री शर्मा यांनी उपस्थित गुंतवणुकदारांना दिली. उद्योगमंत्री राठोड म्हणाले की, पूर्वीच्या गेहलोत सरकारने चार वर्षानंतर गुंतवणुक परिषद आयोजित केली होती. आम्ही सत्तेवर येताच पाचव्या महिन्यात घेत आहोत. सहज व्यवसाय आणि नफ्याचा व्यवसाय ही राजस्थानातील गुंतवणुकीची दोन वैशिष्टे आहेत. देशातला व्यवसायी समुदाय हा राजस्थानी आहे, मात्र पुढच्या पाच वर्षात राजस्थान हे देशातले उद्योगांचे राज्य ओळखले जाईल, असा दावा त्यांनी केला. यावेळीपरिषदेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. टाटा टेक्नोलॉजी, महेंद्रा पाॅवर, हिरानंदानी ग्रुप, केके बिर्ला ग्रुप, सीआयआय यांच्याबरोबर गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थित करण्यात आले. डिसेंबर मध्ये जयपूर येथे होत असलेल्या गुंतवणूक परिषदेच्या प्रचारार्थ राजस्थान सरकार दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, जापान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अरब अमीरात, सऊदी अरब, जर्मनी, युनाटेड किंगडम येथे ‘रोड शो’ करणार आहे.