मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतही काही भागात मागील दोन दिवसांपासून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा फारसा जोर नव्हता. काही ठराविक भागात हलक्या सरी बरसल्या. मात्र, मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारण गुरुवारपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील. सायंकाळनंतर अनेक भागात जोरदार पाऊस पडेल. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.







