नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे की लवकरच देशातील सर्व ७४,००० डब्यांमध्ये आणि १५,००० इंजिनांमध्ये अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक डब्यामध्ये चार ‘डोम टाईप’ CCTV कॅमेरे बसवले जातील. दोन समोरील व दोन मागील दरवाजांजवळ हे सीसीटीव्ही असतील. तर इंजिनमध्ये सहा कॅमेरे असतील. यात पुढे, मागे, दोन्ही बाजूंना आणि दोन्ही कॅबिनमध्ये प्रत्येकी एक कॅमेरा तसेच दोन डेस्क-लावलेले मायक्रोफोनदेखील बसवले जातील. प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार करताना, कॅमेरे केवळ डब्यांच्या सामान्य हालचाली क्षेत्रात (दरवाज्याजवळ) लावले जाणार आहेत. यामुळे डब्यांमधील खासगी भाग किंवा शयनक्षेत्र सुरक्षित राहील. सध्या केवळ वंदे भारत, अमृत भारत आणि वंदे मेट्रो गाड्यांमध्येच CCTV यंत्रणा उपलब्ध आहे. पण लवकरच संपूर्ण देशभरातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा लागू होणार आहे.







