वृत्तसंस्था : शहानूर मिया दर्गा चौकातील आठवडे बाजाराच्या मैदानात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. जवाहरनगर पोलिसांनी २ लाख १० हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो बंगळुरूला विकण्यासाठी घेऊन जात होता. ट्रॅव्हल्समध्ये बसण्याआधीच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. ही कारवाई रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव इरफान पाशा आरीफ पाशा (वय ४२, रा. भंगी कॉलनी, पेन्शन मोहल्ला, दक्षिण बंगळुरू, राज्य कर्नाटक) असे आहे.
जवाहरनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की निळे शर्ट घातलेला एक व्यक्ती शहानूरमिया दर्गा चौकातून ट्रॅव्हल्सने गांजा घेऊन जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी लगेचच सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी दर्गा चौकातील आठवडे बाजार मैदानावर सापळा लावला. त्री साडेनऊच्या सुमारास संशयित इरफान येताना दिसला. तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील दोन बॅगांमध्ये गांजा मिळून आला. तो हा गांजा बंगळुरू येथे विक्री करण्यासाठी ट्रॅव्हल्सने घेऊन जात होता, अशी कबुली त्याने दिली. त्याच्याकडे १० किलो १७५ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.







