मुंबई : अंधेरी (पूर्व) भागातील हरित क्षेत्रात वाढ व्हावी, पर्यावरणाचे संतुलन, तसेच संबंधित परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘के पूर्व’ विभागाने गेल्या वर्षभरात ३६ हजारांहून अधिक झाडांचे रोपण केले आहे. यात मियावादी पद्धतीने झाडांची लागवड केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये शहरात विकासकामांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे झाडांचीही संख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान विभागाने झाडांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहेत. पालिकेच्या २४ विभागांतील विविध उद्यानांमध्ये वृक्षलागवड केली जात आहे. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत पालिकेतर्फे एकूण ९ ठिकाणी अमृत वाटिकाही साकारण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेच्या ‘के पूर्व’ विभागानेही वृक्षलागवडीमध्ये पुढाकार घेतला असून २०२२-२३ या वर्षात एकूण ३६ हजार २१० झाडांचे रोपण केले आहे. यात मियावादी वृक्षांचाही समावेश असून अंधेरी येथील कनकिया व वेरावली या भागात मियावादी वृक्षलागवड करण्यात आली आहे. मियावाकी पद्धतीने एकूण ३६ हजार वृक्ष लावण्यात आले आहेत. ‘के पूर्व’ विभागाने २०१९ ते २०२३ या कालावधीत एकूण ३८ हजार ७७५ झाडांचे रोपण केले आहे.
महानगरपालिकेच्या ‘के पूर्व’ विभागातर्फे २०१९-२० या वर्षात अंधेरीत ६०० वृक्षलागवड केली. तर, २०२०-२१ मध्ये ५१० झाडांचे रोपण करण्यात आले. २०२१ ते २२ या कालावधीत १४५५ आणि २०२२-०२३ मध्ये ३६ हजार २१० असे एकूण ३८ हजार ७७५ झाडे लावण्यात आली.