पुणे : घातक शस्त्रांचे रॅकेट उखडून फेकण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेली शस्त्रविरोधी मोहीम राज्यभर गाजत आहे. १९ जानेवारी २०२३ पासून ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सलग चार वेळा ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये तब्बल२६३ पिस्तूल, ३६३ जिवंत काडतुसे आणि ६७९ विविध घातक शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली. या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्पर्धात्मक स्वरूपात राबवण्यात आली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली.
विविध गुन्हे शाखा, युनिट्स आणि पोलिस पथकांमध्ये कार्यक्षमतेची जाणीव निर्माण करण्यासाठी गुणपद्धती अवलंबली गेली. कोयता, तलवार, पालघन, सुरा, चाकू यांसारख्या हत्याराला एक गुण आणि पिस्तुल जप्त केल्यास दहा गुण देण्यात आले. या गुणपद्धतीमुळे प्रत्येक पथकाने पिस्तुल जप्तीवर अधिक भर दिला. परिणामी केवळ पारंपरिक हत्यारेच नव्हे, तर अवैध पिस्तुले आणि जिवंत काडतुसे मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या हाती लागली. प्रत्येक जिल्हा व आयुक्तालय पातळीवर अधूनमधून अवैध शस्त्रविरोधी कारवाई होत असते; मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईला मोहिमात्मक स्वरूप देऊन अंतर्गत स्पर्धा निर्माण केली. त्यामुळे कमी कालावधीत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले. राज्यातील इतर कोणत्याही आयुक्तालयाने आजवर अशी पद्धत अवलंबलेली नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही धडाकेबाज मोहीम राज्यभर कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी अनेक गुन्ह्यांत अवैध शस्त्रांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ वाद, टोळक्यांचे संघर्ष किंवा वर्चस्वाच्या वादातून पिस्तूल, कोयते, तलवारी वापरून हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या; मात्र या मोहिमेमुळे गुन्हेगारांना होणारा शस्त्रसाठ्याचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे या काळात अपवाद वगळता गोळीबाराच्या घटना घडल्या नाहीत, तसेच मोठ्या गुन्ह्यांनाही आळा बसला. एकंदरीत शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात या मोहिमांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते.
शस्त्रविरोधी मोहिमेचे फायदे –
• शस्त्रविरोधी मोहिमेचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम
• गुन्हेगारांकडील मोठा शस्त्रसाठा मोडीत निघाला
• नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण
• व्यापारी, उद्योजक, दुकानदारांना दिलासा
• पोलिस दलात गुणात्मक स्पर्धा विकसित
• भविष्यातील मोठ्या गुन्ह्यांना पायबंद