मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होऊन आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र तरीही या मार्गिकेवरील मोबाइल नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या मार्गिकेवरुन प्रवास करताना मोबाइलचा वापरच करता येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) अजूनही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. मोबाईल नेटवर्कची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मोबाईल कंपन्यांना तयार करण्यात एमएमआरसी यशस्वी ठरत नसल्याचे चित्र आहे. एमएमआरसी आणि कंपन्यांचा वादात प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
एमएमआरसीकडून आरे ते कफ परेड अशा ३३.५ किमीच्या भुयारी मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये आणि आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड हा तिसरा टप्पा ऑक्टोबर २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. ही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल करताना प्रवाशांना मोबाईल नेटवर्कची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरसीने एका कंपनीची नियुक्ती करत या कंपनीच्या माध्यमातून नेटवर्क यंत्रणा उभारली. मात्र नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यासाठी या कंपनीकडून भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याचे म्हणत मोबाईल कंपन्यांनी मेट्रो ३ मार्गिकेत नेटवर्क सुविधा पुरविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच मेट्रो ३ मार्गिकेतील पहिला टप्पा सेवेत दाखल झाला तेव्हापासून ते आजपर्यंत या मार्गिकेत मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान वोडाफोन कंपनीची मनधरणी करण्यात एमएमआरसीला यश आल्याने मेट्रो ३ मार्गिकेत वोडाफोनची नेटवर्क सुविधा आहे. मात्र ही सुविधा केवळ आरे ते आचार्य अत्रे चौकदरम्यानच आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकानंतर ही सुविधा बंद होते.त्यामुळे प्रवाशांमध्ये नेटवर्क प्रश्नावरुन नाराजी आहे. नेटवर्कची सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रवाशांची आहे.







