मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारत आपले सर्वच ९ उमेदवार निवडून आणले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का बसला. शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ८ मते फुटल्याचे समोर आले आहे. या फुटलेल्या आमदारांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना दिले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी जयंत पाटील यांच्या पराभवावर चिंतन करण्यात आले. लोकसभेत १३ जागा मिळवून देखील विधानपरिषद निवडणुकीत पक्षाची मते फुटलीच कशी? असा सवाल काँग्रेस हायकमांडने उपस्थित केला. तसेच फुटीर आमदारांना शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशा सूचना देखील काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्या. त्यामुळे फुटलेले आमदार नेमके कोण? हे शोधण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांवर असणार आहे. जर आमदारांची नावे समोरच आलीच तर त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे, काँग्रेसची ही मते फुटण्याची काही पहिलीच वेळ नाही. मागील निवडणुकी वेळीही काँग्रेस पक्षाची मते फुटली होती. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने पक्षावर मोठी नामुष्की ओढावली आहे. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या बैठकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे हायकमांडचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले आहेत. काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याने शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याचं काँग्रेस हायकमांडचे मत आहेत. त्यांचा पराभव म्हणजेच महाविकास आघाडीचाच पराभव आहे, असंही हायकमांडने म्हटलं आहे. पक्षाविरोधात कारवाई करून सत्ताधाऱ्यांना मतदान करणाऱ्या आमदारांना शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.