मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, पुनर्पूष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या व रस्तेदुरुस्तीची कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही निर्देश देण्यात आले. मुंबईत ठिकठिकाणी रस्तेबांधणी व डागडुजीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रस्तेकामांच्या प्रगतीचा, डागडुजीचा काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला होता. त्या वेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करा, रस्ते वाहतूकयोग्य करा व पावसाळ्यात कोणत्याही रस्त्याचे काम सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय करू नये, असे निर्देश गगराणी यांनी दिले होते.
द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी भेट देऊन रस्तेदुरुस्ती कामांची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के. बी. गायकवाड नगर, कुर्ला येथील राहुल नगर, घाटकोपर येथील छेडा नगर, घाटकोपर येथील पंत नगर जंक्शन, जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता (जेव्हीएलआर) जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदानगर या ठिकाणांना भेट दिली. या पाहणी दौऱ्यात प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी बांगर यांनी संबंधितांना अभियंत्यांनी रस्ते कामाशी संबंधित विविध विभागांसमवेत योग्य समन्वय ठेवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देशही बांगर यांनी दिले आहे.