वृत्तसंस्था : साधारण ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसमध्ये ९० ते १०० प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींविरोधात शेगावातील चालकवाहकांनी बुधवारी अनोखे आंदोलन केले. आता सर्व काही नियमानुसारच होणार, म्हणून प्रवासी क्षमता ५५ अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली.
शेगाव एसटी आगारामध्ये आधीच एसटी बसेसची कमतरता असून या बसस्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील एसटी आगाराचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरीता एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात. असे विद्यार्थी व प्रवासी नेहमीच चालकवाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करतात. तर वरिष्ठ अधिकारी कुठलीही शहानिशा न करता चालकवाहकांना जाब विचारतात. यामुळे त्रस्त होऊन चालकवाहकांनी शेगावच्या बसस्थानकात अनोखे आंदोलन करून आजपासून ५५ प्रवाशांपेक्षा एकही अधिकचा प्रवासी एसटी बसमध्ये घेणार नसल्याचा पवित्रा घेत शेगाव ते जळगाव आणि शेगाव ते पातुर्डा या बसमधून जादाचे प्रवासी खाली उतरवून देण्यात आले, अशी माहिती एसटी बस वाहक महेश बुरुंगले यांनी दिली.







