मुंबई : नीट निकालात झालेले गोंधळ आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील पोलीस यंत्रणांना खबरदारीचा घेण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. नीट निकालाच्या पार्श्वभूमिवर काही व्यक्ती, शिक्षण संस्था विद्यार्थांना चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अशी चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्याबाबतही गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे.
नीटचा निकालाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षणसंस्थांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. न्यायालयीन प्रकरणांबरोबरच देशात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्याच्या पोलीस महासंचालकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे अनेक ठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. अशी चुकीची माहिती पसरवणारी व्यक्ती अथवा शिक्षण संस्थांची माहिती घ्यावी, तसेच आंदोलनाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धणार नाही याची काळजी घ्यावी, आंदोलनाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला माहिती द्यावी, अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत.