नवी मुंबई : पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जनसायकल व इलेक्ट्रिक बाइक प्रणालीला नवी मुंबईकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकून ४० किमी नव्या सायकल ट्रॅकचे नियोजन केले आहे. शहरातील कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणि पर्यावरणपूरक दळणवळण व्यवस्था निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. याआधी महापालिकेने नेरूळ आणि वाशी येथे सायकल मार्गिका तयार केल्या आहेत. त्यात आणखी नवीन सायकल मार्गिका तयार होऊन अधिकाधिक नवी मुंबईकरांना याचा लाभ घेता येणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असतात. जनसायकल सहभाग प्रणाली योजना राबवून नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना सायकल आणि बॅटरीवरील दुचाकी भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याआधी महापालिकेने वाशी येथे सागर विहार परिसर ते सेक्टर नऊपर्यंत सुमारे दोन किलोमीटरची सायकल मार्गिका तयार केली आहे. नेरूळला पामबीच रस्त्यालगत सेवारस्त्यावर सायकल मार्गिका आहे. पामबीच मार्गावरील नऊ मीटरच्या जागेमध्येच ही मार्गिका आहे. सध्या महापालिकेतर्फे नवीन तयार केल्या जाणाऱ्या सायकल मार्गिका अडीच ते तीन मीटर रुंदीच्या असणार आहेत. या सायकलमार्गिकांसाठी पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्ट्यांचा वापर केला जाणार आहे.
– घणसोली-ऐरोली रस्त्याच्या कडेला आठ किलोमीटरच्या मार्गिकेचे काम सुरू.
– ऐरोलीला डीएव्ही शाळा ते सेक्टर १४, १५ येथे ३.२ किमीची मार्गिका होणार.
– पटनी रोडवर इच्छापूर्ती गणेश मंदिर ते पटनी कंपनीपर्यंत सहा किमीची मार्गिका साकारणार.
– नेरूळला ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ येथे सायकलमार्गिका तयार केली जाणार.
– पामबीच मार्गावरील सेवा रस्त्यालगत नऊ किमीची सायकलमार्गिका तयार होणार.
– बेलापूर येथील रमाबाई नगर वसाहतीपासून ते खारघर रेनट्री हीलपर्यंत ४.२ किमीची सायकलमार्गिका होणार.