मुंबई : ‘यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी आगमन-विसर्जन मार्गांचा आढावा घ्या. तसेच त्या मार्गांवर खड्डे आढळून आल्यास पुढील आठवड्याच्या आत ते बुजवा,’ असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यंदा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ही परंपरा महापालिकेने यंदाही राखली आहे. उलट यात, रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांच्या समस्येचीही भर घातली आहे. त्यामुळे गणपती आगमन-विसर्जनावेळी याचा त्रास गणेशमंडळांना होऊ शकतो, अशी कुजबूज मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मुंबईत १५ ऑगस्टपासून मोठ्या सार्वजनिक गणेशोत्वस मंडळांच्या गणपतीमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. आगामी ३ सप्टेंबरला रविवार असून, त्या दिवशी मोठ्या मंडळांच्या ११ गणेशमूर्ती, ९ सप्टेंबरला आठ, तर १० सप्टेंबरला २७ मोठ्या गणेशमंडळांच्या मूर्तींचे आगमन होणार आहे. ही संख्या पुढे आणखी वाढत जाईल. त्यामुळे त्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.