मुंबई : माटुंगा येथील किंग्ज सर्कल परिसरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा जी.एस.बी. (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळाचा गणेशोत्सव यंदा ७२ व्या वर्षात पदार्पण करत असून, उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक देश-विदेशातून मुंबईत दाखल होतात. धार्मिक परंपरा, वैदिक पद्धतीने होणारे विधी, सुवर्ण-रौप्य दागिन्यांनी सजलेली मूर्ती आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे हा उत्सव देशातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवांपैकी एक मानला जातो. यंदा मंडळाने तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले असून, ही बाब सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. या विमा संरक्षणामध्ये गणेशमूर्ती, मंडप, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाधारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचाही समावेश आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाही महागणपतीला ६६ किलोहून अधिक सोन्याचे दागिने, ३३५ किलोहून अधिक चांदी आणि विविध मौल्यवान रत्नांनी अलंकृत करण्यात येणार आहे. या दागिन्यांचा मोठा हिस्सा भाविक आणि सेवाधाऱ्यांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीतून उपलब्ध झाला आहे. भव्य सजावट, धार्मिक शिस्त आणि वैदिक परंपरा यामुळे जीएसबी महागणपतीचा उत्सव देशभरातील गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता महागणपतीच्या ‘विराट दर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत मुख्य गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या पाच दिवसांत पूजा, अर्चना, गणहोम, तुलाभार, अन्नदान आणि विविध धार्मिक सेवा शास्त्रोक्त व वैदिक पद्धतीने पार पडतील. मंडपात दररोज सरासरी १ लाखांहून अधिक भाविक दर्शन आणि पूजेसाठी उपस्थित राहतात. अन्नदान ही या उत्सवाची आणखी एक महत्त्वाची परंपरा असून, दररोज ४० हजारांहून अधिक, तर संपूर्ण उत्सवकाळात २ लाखांहून अधिक भाविकांना मोफत प्रसादाचे भोजन दिले जाते. विशेष म्हणजे, हा प्रसाद पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर वाढला जातो. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मंडळाने यंदाही ‘गो ग्रीन’ उपक्रमावर भर दिला आहे. छापील पावत्यांऐवजी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन कागदाचा वापर कमी करण्यात येत आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, स्वच्छता आणि शाश्वत व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपक्रम आणि उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेचा संगम असलेला जीएसबी सेवा मंडळाचा हा गणेशोत्सव यंदाही मुंबईतील सर्वाधिक चर्चेचा आणि भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.






