मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पूल पाडकामासाठी आज (२५ एप्रिल) रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आलीये. बुधवारी पोलिसांनी एक महत्त्वाची अधिसूचना जारी करून माहिती दिली की, २५ एप्रिलपासून एल्फिन्स्टन पुलावरून वाहतूक नियम बदलण्यात आले आहेत. पूर्व आणि पश्चिम दिशेने परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्याच्या जागी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे एक नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल बांधला जात आहे. जो शिवडी-वरळी उन्नत रस्त्याला जोडेल. या बांधकामामुळे एल्फिन्स्टन पुलावरून वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून हा पूल वाहनांसाठी बंद राहील. वाहतूक वळवण्याच्या पद्धतीनुसार, पूर्व ते पश्चिम आणि पश्चिम ते पूर्व दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करत असाल तर दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पूल वापरा. परळ पूर्वेकडून प्रभादेवी/लोअर परळला जाण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करी रोड ब्रिजवरून प्रवास करता येतो. भायखळा पूर्वेकडून वरळी कोस्टल रोड/सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करा. दादर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी, वाहनचालक टिळक पुलाचा वापर करू शकतात. प्रभादेवी/लोअर परळ पश्चिमेकडून टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल/परळला जाण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करा. हा मार्ग दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत खुला राहील. कोस्टल रोड, सी लिंक, वरळी, प्रभादेवी ते परळ आणि भायखळा पूर्वेला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करा.







