मुंबई : हवा प्रदूषण नियंत्रणासाठी फटाके वाजविण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात पाच दिवसांत सुमारे ११३४ नागरिकांवर बेकायदेशीरपणे फटाके फोडल्या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील २ दिवसात ३५० गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत नियम उल्लंघनप्रकरणी मुंबईत ११३४ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील बहुसंख्य गुन्हे फटाक्यांसाठीच्या वेळमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी १०, ११ आणि १२ नोव्हेंबर या तीन दिवसांत ७८४ गुन्हे दाखल केले. याप्रकरणी ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर २ दिवसांत आणखी ३५० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषण अधिक झाले आहे. १० नोव्हेंबर रोजी, वायू प्रदूषणासंदर्भातील सू-मोटो याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करून रात्री ८ ते रात्री १० या वेळेत परवानगी दिली होती. यापूर्वी हायकोर्टाने संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. याशिवाय बेरियम रसायन असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.