मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर १४ एप्रिलला दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीने अभिनेत्याला युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी दिली होती. या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर त्याला बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तीने व्हिडिओ युट्युबवर पोस्ट करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने अभिनेत्याला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी दिली होती. या आरोपाखाली त्याला मुंबईच्या सायबर पोलीस स्थानकात ५०६ (२) भादवी कलमांसह ६६ (ड) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचं नाव बनवारीलाल गुजर असं असून आरोपीला राजस्थानवरून अटक केली आहे. गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१४ एप्रिल रोजी पहाटे दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर बाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चार ते पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली होती.