मुंबई : हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये मागील २० दिवसांमध्ये करोनाचे ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
मुंबईत मागील चार महिन्यांत करोनाचे रुग्ण तुरळक सापडत होते. मात्र मे महिन्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या वीस दिवसांत करोनाचे तब्बल ९५ रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात करोनाचे १०६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील मुंबईमध्ये सर्वाधिक १०१ रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी मे महिन्यात ९५ रुग्ण सापडले आहेत. तर जानेवारी ते एप्रिलदरम्यान फक्त सहा रुग्ण सापडले होते. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, एप्रिलमध्ये चार रुग्ण सापडले होते. मुंबईप्रमाणे मे महिन्यांत राज्यातही करोनाचे रुग्ण सापडले आहेत. राज्यात २० मे रोजी करोनाचे १९ रुग्ण सापडले. त्यात मुंबईत १५, कोल्हापूरमध्ये तीन तर पुण्यात एक रुग्ण सापडला आहे. राज्यामध्ये सापडलेल्या रुग्णांपैकी ३६ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ५२ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. तर १६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.







