रायगड : कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन सुरू होईल तर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून सिमेंट ट्रीटेड बेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिकेचे काम पूर्ण होऊन ती मार्गिका सुरु होईल. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरु होणार असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.चव्हाण यांनी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या. सध्या पावसाळ्यात महामार्गाचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे यामध्ये हलगर्जीपणा नको तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी असलेल्या वन विभाग, भूसंपादन, न्यायालयीन प्रक्रिया व अन्य बाबींच्या परवानग्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलदरम्यान रस्त्यांच्या कामांची पाहणी करतेवेळी त्यांनी पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.