मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. त्यामुळे अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी रितसर तयारी देखील करण्यात आली होती. पण, अचानक मनसेने त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही लढत सोपी झाली आहे. अभिजीत पानसे आज दुपारी अर्ज दाखल करणार होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. नेत्यांना बोलावण्यात आलं होतं, शिवाय मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार होते. सकाळी निरंजन डावखरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यावेळी मनसेचे उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती ठाकरेंकडे करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस यांची विनंती राज ठाकरे यांनी मान्य केल्याचं दिसत आहे. कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेला मानणारा पदवीधर वर्ग आहे. त्यामुळे भाजपच्या मतदानावर याचा परिणाम होणार होता. त्यामुळेच फडणवीस यांनी हा शब्द राज ठाकरे यांच्याकडे टाकला होता. नितीन सरदेसाई यांनी जाहीर केलंय की, कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे भाजपसाठी ही लढत खूप सोपी असणार आहे. निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. २४ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे. शिवसेनेकडून संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, संजय मोरे देखील अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.