मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यासंदर्भात मनसेची १३ जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. अशामध्ये मनसे महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी मुंबईमध्ये मनसेची महत्वाची बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकारणी निवडणूक देखील याच दिवशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील मराठी नागरिक राहत असलेले परिसर म्हणजेच दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे. ४ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.