मुंबई : कलावंतांची खरी संपत्ती ही कलेची निर्मिती असते. ती राज्याची, देशाची व जगाचीही असते. त्या कलेचे वैभव जोपासण्यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने प्रयत्न करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,कला संचालक राजेश मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत शासकीय उच्च कला परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा यांचे प्रस्तावित परीक्षा शुल्कास तसेच उच्चकला पदविका प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कास मान्यता, राज्यकला शिक्षण मंडळासाठी लेखा परिक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय पीएलएमधून तात्पुरत्या स्वरूपात निधी देण्यास मान्यता, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा परीक्षा,शुल्क निश्चित समितीच्या कामासाठी संगणक प्रणाली राबविणे याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.