मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लहान मुलांचे अन्न (Baby Food) आणि ‘फॉर्म्युला मिल्क’ उत्पादनांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार कोणत्याही परिस्थितीत पूरक आहाराला आईच्या दुधापेक्षा श्रेष्ठ किंवा अधिक फायदेशीर असल्याचे दर्शवता येणार नाही. लहान मुलांच्या अन्नाच्या पॅकेजिंगवर आई आणि बाळाचे चित्र वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही कंपनीला आपल्या उत्पादनांची तुलना आईच्या दुधाशी करून ते तितकेच आरोग्यदायी किंवा फायदेशीर असल्याचा दावा करता येणार नाही.
महाराष्ट्र FDA ने स्पष्ट केले आहे की, हा आदेश फॉर्म्युला मिल्कवर बंदी घालणारा नाही. फॉर्म्युला उत्पादनांची विक्री सुरू राहणार असून, मात्र उत्पादकांना केंद्र व राज्य सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर ‘आईचे दूध सर्वोत्तम आहे’ (Mother’s Milk Is Best) असा संदेश स्पष्टपणे छापण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हे उत्पादन सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी केवळ पूरक आहार म्हणून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे, असे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम दोन वर्षांखालील मुलांसाठी तयार करण्यात येणारे तृणधान्य आधारित पदार्थ (Cereals), पूरक आहार आणि इतर बाल आहार उत्पादनांनाही लागू राहणार आहेत. याशिवाय अशा उत्पादनांच्या जाहिराती, मोफत नमुने वाटप आणि सवलतीचे कूपन देण्यावरही FDA ने बंदी घातली आहे. तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, FDA च्या सर्वेक्षणामध्ये अनेक कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळून आल्या आहेत. लहान मुलांना योग्य पोषण मिळावे आणि स्तनपानाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात जन्मानंतरच्या पहिल्या तासापासून सहा महिन्यांपर्यंत स्तनपानाचे प्रमाण शहरी भागात ५२.८ टक्के, तर ग्रामीण भागात ७५.२ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त मुंडे यांनी पुढे सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागातील स्तनपानाचे प्रमाण समाधानकारक नसल्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. लहान वयातच मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या वाढत आहेत. एका सर्वेक्षणात १० ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे २५ टक्के मुले उच्च रक्तदाबाने त्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आईच्या दुधाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी FDA कडून ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.






