पुणे : पुण्यामध्ये २५० ते ३०० गुटख्यांची पोती जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील नन्हे परिसरातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची गुटखा जप्त केला आहे. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नन्हें परिसरातील गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. या छापेमारीतून पोलिसांनी २५० ते ३०० पोती गुटखा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे १ कोटी ३९ लाखांच्या आसपास आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने ४ जणांना अटक केली आहे.
पुण्यातून अहमदनगर, नाशिक, सातारा अशा अनेक ठिकाणी या गुटख्याची विक्री होत होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारखान्यांवरून गुटखा तयार करण्याचे सामग्री सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये गुटखा विक्री आणि तयारी करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पुष्पेंद्र सिंग, सुनिल सिंग, मुकेश गेहलोत आणि चंदन सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासोबतच या आरोपींचा साथीदार निलेश ललवानी याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यामधून पोलिसांना आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.