मुंबई : मुंबईतील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांत वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरांत विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजूपाडासह मीरा-भाईंदर महापालिका या सर्व क्षेत्रांत वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी करणारी याचिका महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केली आहे. अदानीसह खासगी वीज कंपन्यांनी राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज परवान्याची मागणी करणारे अर्ज आयोगाकडे दाखल केल्याने महावितरणनेही मुंबईत वीज परवाना मिळविण्यासाठी आयोगापुढे याचिका केली. मुंबईत सध्या बेस्ट ही महापालिकेची कंपनी आणि अदानी व टाटा पॉवर मुंबई या दोन खासगी कंपन्या वीजपुरवठा करतात, तर महावितरण अर्जात नमूद केलेले क्षेत्र वगळता राज्यात आणि मुंबईतील मुलुंड व भांडुप या दोन उपनगरांत वीजपुरवठा करते.
महावितरण ही जगातील सर्वात मोठ्या वीज कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सध्या ३ कोटी १७ लाख वीज ग्राहकांना सेवा देते. कंपनीकडे ४,२३० वीज उपकेंद्रे, सुमारे २५ हजार उच्च दाब फीडर्स, ९ लाख ६० हजार वितरण ट्रान्सफॉर्मर्स, ११ किलोव्होल्टच्या ३.६४ लाख किलोमीटर लांबीच्या वाहिन्या, ३३ किलो व्होल्टच्या ५१,७७१ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या असे प्रचंड वीज वितरण जाळे आहे. महावितरण राज्यातील ४५७ शहरांना आणि ४१,९२८ खेड्यांना वीजपुरवठा करते. मुंबईची सध्याची विजेची गरज ४ हजार मेगावॉट आहे तर महावितरण सध्या राज्यात दररोज २६ हजार मेगावॉट वीजपुरवठा करीत आहे.







