मुंबई : सर्वांचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने शहरांपासून गावागावांपर्यंतचे वातावरण दुमदुमून गेले. मुंबईतील गल्ल्यांपासून कोकणातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत बाप्पाच्या आगमनाने आनंद आणि उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईत विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सकाळपासूनच गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती.
लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा यांसह अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये विधिवत पूजा-अर्चा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनासाठी सजविण्यात आलेले मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट यामुळे मुंबईचे वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मानाचा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीची मयूर रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक पार पडली. त्यानंतर विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. कोकणातील परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे दर्शन घडविणारा हा सर्वात मोठा सण मानला जातो. त्यामुळे कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज झाले आहेत. कोकणातील काही भागांत आजही पारंपरिक पद्धतीने बाप्पाला डोक्यावर घेऊन वाजत-गाजत घरी आणण्याची प्रथा जपली जाते. हिरव्यागार शेतांच्या बांधावरून, निसर्गाच्या सान्निध्यातून बाप्पाला डोक्यावर घेऊन जाणारे भाविक आणि त्यांच्यासोबत असलेला ढोल-ताशांचा गजर हे दृश्य मन मोहून टाकणारे ठरते. भक्ती, परंपरा आणि संस्कृतीच्या संगमातून राज्यभर गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढील दिवसांत बाप्पाच्या भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र रंगून जाणार आहे.






