मुंबई : मुंबई सायबर पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांचे सुमारे एक हजार मोबाइल क्रमांकांची यादी दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाकडे (डीओटी) कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी पाठवली आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर किंवा ‘१९३०’ हेल्पलाइनवर सायबर फसवणूक झालेल्यांनी केलेल्या तक्रारींमध्ये हे मोबाइल क्रमांक वारंवार दिसून आल्यानंतर पोलिसांनी पाऊल उचलले आहे. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत सायबर गुन्ह्यांचे १७६० गुन्हे दाखल झाले असून, ४१० जणांना अटक झाली आहे. ‘१९३०’ हेल्पलाइनने ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांकडून गमावलेल्या रकमेपैकी ६७.२ कोटी परत मिळविण्यात यश आले आहे. अनेकदा विविध घटनांमध्ये एकाच मोबाइल क्रमांकाचा वेगवेगळ्या व्यक्तींना फसवण्यासाठी वापर केल्याचेही समोर आले. अनेकदा, खऱ्या टेलिकॉम ग्राहकांच्या कागदपत्रांचा आणि तपशीलांचा सिमकार्ड मिळविण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकतो. ते फसवणूक करणाऱ्यांना विकले जातात, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
एमएचबी कॉलनी पोलिसांनी नुकताच एका रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत बोरीवलीतील एका दुकानातील ९९ सिमकार्ड उत्तर प्रदेशात (यूपी) फसवणूक करण्यासाठी वापरल्याचे समोर आले होते. मोबाइल क्रमांकांसोबत, सायबर पोलिस आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) क्रमांकदेखील ब्लॉक करण्यासाठी दूरसंचार विभागाला पाठवू शकतात. यामुळे फसवणूक करणाऱ्याचे ऑपरेशन अधिक कठीण होईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. ४९ हवालदार आणि दोन उपनिरीक्षकांची टीम शिफ्टमध्ये हेल्पलाइन चालवते. हेल्पलाइन चोवीस तास कार्यरत आहे. एका नवीन उपक्रमात, पोलिस विभागाने ‘१९३०’ हेल्पलाइन कर्मचाऱ्यांसाठी बक्षीसही जारी करण्याची योजना केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन आणि कौतुक व्हावे या उद्देशाने चांगली कामगिरी करणाऱ्यांना ठराविक रक्कम देण्यात येणार असल्याचे समजते.