मुंबई : कोकण रेल्वे आता हलक्या वाहनांसाठीही रो-रो (रोल ऑन- रोल ऑफ) सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. याची चाचपणी सुरू असून याचा सर्वाधिक फायदा गणेशोत्सव आणि होळी सणासाठी कोकणात गावाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे. ही सेवा कार्यान्वित झाल्यावर रस्ते मार्गे होणाऱ्या वाहतुकीतही घट होऊ शकते. कोकण रेल्वेने पावसाळी तयारीविषयक माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यात ही माहिती देण्यात आली. कोकण रेल्वेला सर्वाधिक फायदा ट्रकच्या रो-रो व मालवाहतूक सेवेतून होतो. आता हलक्या वाहनांनाही ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्यांना त्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. गणेशोत्सव काळात कोकणवासीय मोठ्या प्रमाणात आपली चारचाकी वाहने घेऊन गावाकडे जात असतात. मात्र खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी गाड्यांबरोबर रो-रो सर्व्हिस सुरू करण्याचा विचार करीत आहे.
रेल्वे मालगाड्यांवरून कारची रो रो सर्व्हिस सुरू झाल्यास कोकणवासीयांच्या हलक्या वजनाच्या गाड्या विनासायास गावाकडे पोहचण्यास मदत मिळणार आहे. स्वतःकडे कार असूनही रस्त्यांची अवस्था वेळ, खर्च हे सर्वच पाहता मुंबईतील कोकणी व्यक्ती गावी जाण्यासाठी सर्वात जास्त रेल्वेला पसंती देत असते. कोकण रेल्वेने प्रवास केल्यानंतर स्थानकांवर उतरून पुन्हा आसपासच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर स्वतःकडे गाड्या असणाऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मुंबई ते कोकण रस्ता अनेक दशकांच्या पासून पूर्णत्वास येऊ शकलेला नाही. त्यात प्रवासी आणि गाड्यांची वाढलेली संख्येने गणपती उत्सव वा होळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पावसाळ्यात त्याचे प्रमाण अधिक असते. अशात रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.







