कल्याण : कल्याण, डोंबिवली हद्दीतील पोलीस लोकसभा निवडणूक कामावर व्यस्त असल्याने रात्रीच्या वेळेत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यात सलग चार दिवस कल्याण पूर्वे, डोंबिवलीत घरफोड्या करून चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लांबविला आहे. दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, काटेमानिवली भागात घरफोड्या झाल्याच्या तक्रारी आहेत. या घटना ताज्या असतानाच डोंबिवलीत विष्णुनगरमध्ये आणि कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर हद्दीत तुळशी पवार या महिला राहतात. त्या कोपर छेद रस्त्यावरील नील कमल बंगल्या शेजारील अजित पवार चाळ भागात राहतात. मंगळवारी, बुधवारी त्या काही कामानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील तिजोरीत असलेले दोन लाख ४५ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम असा ऐवज लुटून पलायन केले. असाच प्रकार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील खडेगोळवली भागातील कृष्णा उपाध्याय चाळीत घडला आहे. या चाळीत राहणाऱ्या तक्रारदार पौर्णिमा जाधव या रविवारी आपल्या नातेवाईकांच्या शेजारील घरी वाढदिवस कार्यक्रमासाठी कुटुंबासह गेल्या होत्या. यावेळी पाळत ठेऊन असलेल्या भुरट्या चोराने जाधव यांच्या घरात कोणीही नाही या संधीचा गैरफायदा घेत त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ८१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. पौर्णिमा जाधव कार्यक्रम उरकून घरी आल्या तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांना संशय आला. त्यांनी कपाटातील तिजोरी पाहिली तर त्यात ठेवलेला ऐवज नसल्याचे दिसले. चोरट्याने चोरी केल्याने त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.