मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव जवळ आलेला असताना मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची व्याप्ती बुधवारी वाढली असून प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कोकणातील एसटीची वाहतूक रखडल्याने प्रवासी एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांचा हा अघोषित संप बकायदेशीर ठरवला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यातील एसटीच्या २५१ पैकी ९६ आगारांमधील कारभार बुधवारी दुपारपर्यंत पूर्णतः ठप्प झाला आहे. बुधवारी सुमारे ३७ आगारांतील कामकाज ठप्प झाले असून ८२ आगारांमध्ये अंशतः कामकाज सुरू आहे. तर, ७३ आगारांतील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून कोकणात ४ सप्टेंबर रोजी १ हजार ६ बस, ५ सप्टेंबर रोजी ३,५१८ बस, ६ सप्टेंबर रोजी २७६ बस सोडण्यात येणार आहेत. संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बस उपलब्ध न झाल्यास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. एसटी महामंडळ वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी चाचपणी सुरू आहे, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.