मुंबई : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील ३२ वर्षे जुना लोखंडी पूल कोसळला. यामुळे पुन्हा एकदा पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहे. त्यानुसारच, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मुख्य सचिवांनी दिलेल्या या आदेशाचा काही प्रमाणात फायदा होऊन पुढील दुर्घटना टाळता येतील.
राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर सूचनाफलक लावण्यासोबतच दुरुस्ती होईपर्यंत ती तात्पुरती बंद करावीत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रशासन किंवा पोलिस यंत्रणेच्या सूचनांनंतरही खबरदारी न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील कुंडमाळ येथे इंद्रायणी नदीवर बांधलेला लोखंडी पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता. तरीही रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्या पुलावर चढले. यामुळे पुलाचा एक भाग तुटून नदीत पडला. दरम्यान, या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर मुख्य सचिवांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.







