कोकण : राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कोकणात, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाने मंगळवारी दाणादाण उडवली होती. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पडणारा हा वळिवाचा पाऊस आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.







