महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर सध्या एक मोठे स्थित्यंतर घडत आहे. एकेकाळी राज्याच्या संस्कृती आणि भाषेचे प्रतीक असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा आज अनेक आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि देशभरातून येणारा हिंदीवादाचा दबाव, या दुहेरी संकटामुळे मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. ‘ग्लोबल व्हिलेज’च्या संकल्पनेत इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढल्याने, पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईत फेब्रुवारी २०२५ मध्ये ७३ नवीन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्या पैकी ६५ शाळा ह्या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. चांगल्या नोकरीच्या संधी, उच्च शिक्षणातील सोयीस्करता आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या कल्पनांमुळे इंग्रजी माध्यमांकडे ओढा वाढला आहे. यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत असून, अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठी शाळांमध्ये कमी पटसंख्या, अद्ययावत अभ्यासक्रमाचा अभाव यांसारख्या समस्या देखील इंग्रजी माध्यमांकडे पालकांना आकर्षित करत आहेत.







