मुंबई : राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक भिमराया मेत्री, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविणे हे शासनाच्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शिक्षित करण्यामध्ये शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. वेळ ही अमूल्य बाब असून आयुष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतील आपण महत्त्वाचा घटक असून आयुष्याच्या पुढील वाटचालीत आपणही आपले कर्तव्य पार पाडून समाजासाठी योगदान द्यावे. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जगाशी स्पर्धा करायची असून क्वचित अपयश आले तरीही खचून न जाता ज्ञानाच्या पाठबळावर एकाग्रतेने काम करा, यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीक्षांत समारंभात विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानवता विद्या शाखा, आंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून १ हजार १३० पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात येत असून त्यापैकी ७७८ पदवीधर, ३४१ पदव्युत्तर आणि ११ जणांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपालांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पदवी तर विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात ५३ टक्के विद्यार्थिनी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.