अहिल्यानगर : शिर्डीच्या साईबाबांच्या भाविकांना मागील तीन चार वर्षांपासून फुल- हार नेवून समाधीवर अर्पण करण्यास बंदी घालण्यात आलेली होती. मात्र आता हि बंदी उठविण्यात आली असून साईभक्त व शिर्डी परिसरातील भाविकांना साई समाधीवर फुल हार अर्पण करता येणार आहे. जगभरात २०२० मध्ये कोरोना महामारी आली होती. या महामारीत संपूर्ण देश लॉकडाऊन झाला होता. अर्थात या महामारीत मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. कोरोना महामारी कमी झाल्यानंतर हळूहळू मार्केट, मंदिर, रेल्वे सुरु करण्यात आले होते. त्यानुसार कोरोनाच्या काळात शिर्डीचे साईबाबा दर्शन देखील बंद झाले असताना हळूहळू दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून भाविकांसाठी साई समाधीवर भाविकांना फुल हार नेण्यास बंदी कायम होती. ती आजपर्यंत कायम असल्याने भाविकांना केवळ दर्शन घेता येत होते. याबाबत संभाजीनगर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून हि बंदी उठविण्यात आली आहे.
हार फुले सुरू करावेत यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. दरम्यान यावर औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय दिला असून कोरोना काळानंतर फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे भाविकांना आता साई समाधीवर हार आणि फुले वाहत येणार आहेत. या निर्णयानुसार बंदी उठल्याने साईभक्तांसह फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.