शिर्डी : शिर्डीचे साईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. दररोज हजारो भक्त साईबाबांच्या चरणी लीन होतात. साईबाबांच्या कृपावर्षावाचा अनेकांना अनुभव आला आहे. साईबाबा मंदिरात भाविकांची रेलचेल सुरूच असते. या मंदिरात मोठ्या प्रमाणावर दानही दिले जाते. अलीकडेच एका भाविकाने लाखो रुपये खर्चून एका खिडकीला सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यामुळे या सोन्याच्या खिडकीतून आता साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. सर्व भाविकांना याचा लाभ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा संस्थानाला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. मार्गशीर्ष गुरुवारी एका भाविकाने साईबाबांच्या चरणी मोठे दान दिले आहे. दुबई येथे स्थायिक झालेल्या एका साईभक्ताने मंदिराच्या खिडकीला अर्थात ज्या खिडकीतून साईबाबांचे मुख दर्शन होते, त्याठिकाणी असलेल्या खिडकीला आकर्षक अशी सोन्याचा मुलामा असलेली फ्रेम बनवून त्यावर ‘श्रद्धा सबुरी’ ही सुवर्णअक्षरे देणगी स्वरूपात दिली आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आता ‘सुवर्ण मंदिर’ म्हणून जगाच्या नकाशावर झळकू लागले आहे. साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम दुबईतील भाविकाने अर्पण केली आहे. या खिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुख दर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फ्रेमची किंमत ५५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.







