वृत्तसंस्था : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली असली तरी तरुणांकडून सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरु आहे. काठमांडूमधील संसद भवनाबाहेर निदर्शने सुरू असून पंतप्रधानांविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. सकाळी कर्फ्यू उठवण्यात आला असला तरी संवेदनशील भागात निर्बंध कायम राहतील आणि काही भागात आज मध्यरात्रीपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे. दरम्यान, आयटी मंत्र्यांनी नेपाळ सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली असून ती हळूहळू पूर्ववत केली जाईल अशी घोषणा केली आहे.
काठमांडूमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. संसद भवनाबाहेर मंगळवारी सकाळपासून निदर्शक पंतप्रधानांविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. राजधानीत सकाळपासून कर्फ्यू उठवण्यात आला असला तरी, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती निवासस्थान, पंतप्रधान निवासस्थान, सिंह दरबार आणि संसद भवनाभोवती निर्बंध सुरू आहेत. त्याच वेळी, सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती आणि प्रमुख पक्षांच्या कार्यालयांभोवती संचारबंदी लागू राहणार आहे. आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घराची तोडफोड केली असून आग लावली आहे. कीर्तिपूर नगरपालिकेची इमारत पेटवण्यात आली आहे. तसंच नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते शेर बहादूर देऊबा यांच्या घराची जाळपोळ केली असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. ओली यांच्या पक्षाचे नेते आणि माजी उपपंतप्रधान रघुवीर महासेठ यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.







