मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी लाकडी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. मालाड पूर्व भागातील पिंपरीपाडा परिसरातील पंजाब डेअरी जवळ हे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये लाकडी प्लाय आणि इतर लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने, आग अत्यंत वेगाने पसरली आणि तिने रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या भागातील अरुंद गल्ल्या आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येत होती. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना जवळपास एक किलोमीटर दूरवरून दिसत होती, कारण पेटलेल्या गोदामातून काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरले होते. हे गोडाऊन झोपडपट्टीजवळ असल्याने, आग वस्तीमध्ये पसरेल या भीतीने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कूलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यावर आग लागण्याचे नेमके कारण काय होते, याचा तपास केला जाईल.






