मुंबई : राज्यातील किरकोळ व होलसेल औषध विक्रेते हे मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करतात. यामुळे राज्यामध्ये बनावट औषधांचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेता राज्यातील बनावट औषधांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम व चांगल्या दर्जाची औषधे मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
देशामध्ये औषधांची निर्मिती करणारे उत्पादक हे हिमाचल प्रदेशमधील बद्दी या परिसरात आहेत. त्याखालोखाल गुजरात व उत्तरांचलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती केली जाते. या राज्यातून येणाऱ्या औषधांमधील अनेक औषधे ही प्रमाणित दर्जानुसार नसतात. त्यामुळे नागरिकांना बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळतात. महाराष्ट्रातील बहुतांश किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे या राज्यातून मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी करतात. त्यामुळे राज्यातील नागरिकांना बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बनावट औषधांचा शिरकाव राज्यात रोखण्यांच्या दृष्टीने परराज्यातून येणाऱ्या औषधांवर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांना परराज्यातून येणाऱ्या औषधांचा तपशिल मुख्यालयात उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.